महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १६३ अन्वये याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

आदेशानुसार निवडणूक काळात शासकीय, निमशासकीय किंवा सार्वजनिक मालमत्ता विद्रूप करण्यास मनाई आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालये, इतर शासकीय कार्यालये आणि विधानसभा मतदारसंघ कार्यालयांच्या परिसरात मिरवणूक, मोर्चा, सभा, उपोषण, घोषणाबाजी, वाद्यवादन किंवा गाणी म्हणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पक्षाला ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. फिरत्या वाहनावरून ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई असून सकाळी सहापूर्वी आणि रात्री दहानंतर ध्वनिक्षेपकाचा वापर पूर्णपणे बंद राहील. प्रचारात ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वाहने वापरता येणार नाहीत; शासकीय कामावरील वाहनांना यातून वगळले आहे. धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणांजवळ तात्पुरती पक्ष कार्यालये उघडण्यासही मनाई आहे.

याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ अन्वये निवडणूक होणाऱ्या भागातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार ते मिरवणुकांचे मार्ग ठरवणे, जमावाच्या वर्तनाबाबत आदेश देणे, ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा ठरवणे आणि प्रचारसभांचे ठिकाण, दिनांक व वेळ यावर नियंत्रण ठेवू शकतील. हे अधिकार २५ सप्टेंबरपासून ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू आहेत.

आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.