अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घालण्यासाठी आणि सोनेरी रंगाच्या मोटारींसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘गोल्डन गाईज’ गटातील आणखी एका सदस्याच्या मर्सिडीज मोटारीवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी रविवारी कारवाई केली. पिंपरीतील साई चौकात उभ्या असलेल्या या मोटारीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर पसरला होता.
वाहतूक पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी व्हिडिओची दखल घेऊन कारवाईचे निर्देश दिले. तपासणीत मोटारीच्या काचांवर काळी फिल्म, फॅन्सी नंबरप्लेट आणि मूळ रंगात बदल केल्याचे आढळले. मोटार वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने उभी होती, तसेच विम्याशी संबंधित नियमांचेही उल्लंघन आढळले, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी मोटारीवरील काळी फिल्म आणि फॅन्सी नंबरप्लेट जागीच काढून टाकली. मोटार वाहन कायद्यानुसार विविध उल्लंघनांसाठी मालकाला एकूण ६,५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
मागील आठवड्यातही वाहतूक पोलिसांनी याच गटातील दुसऱ्या सदस्याच्या मोटारीवर अशीच कारवाई केली होती. या गटातील मोटारींवर यापूर्वीही कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.










