भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. हजारे यांच्या आश्रमशाळेत झालेल्या या भेटीत लांडगे यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि विविध सामाजिक व विकासविषयक मुद्द्यांवर चर्चा केली.

लांडगे कुटुंब आणि हजारे यांचे जुने संबंध आहेत. आमदार लांडगे यांचे वडील वस्ताद किसनराव लांडगे आणि अण्णा हजारे यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री असून किसनराव लांडगे अनेकदा राळेगणसिद्धीला भेट देतात. या भेटीत दोन्ही कुटुंबांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ हा प्रकल्प आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने प्रस्तावित आहे. हा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा असेल, असा दावा प्रकल्पाबाबत करण्यात आला आहे. प्रकल्पाची संकल्पना, सध्या सुरू असलेली कार्यवाही आणि स्मारकाचे ऐतिहासिक महत्त्व याची माहिती लांडगे यांनी हजारे यांना दिली.

प्रसिद्धीपत्रकानुसार, संभाजी महाराजांचे शौर्य आणि त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या या स्मारकाच्या उभारणीचे हजारे यांनी कौतुक केले. सामाजिक आणि राष्ट्रहिताच्या कामात सातत्य ठेवण्याचा सल्लाही त्यांनी लांडगे यांना दिला.

ग्रामविकास, व्यसनमुक्ती, पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी हजारे यांनी केलेले काम मार्गदर्शक असून त्यांच्या भेटीमुळे लोकहिताच्या कामासाठी नवी ऊर्जा मिळाल्याची भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केली.