मूल दोन-अडीच वर्षांचे झाले तरी बोलत नाही, हाकेला प्रतिसाद देत नाही, अशा वेळी तपासणीत जन्मजात कर्णबधिरता असल्याचे समोर येते. अशा मुलांना ऐकू येण्यासाठी आणि बोलण्यासाठी ‘कॉक्लिया पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच’ ही सेवाभावी संस्था १९९८ पासून काम करत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) अश्विनी मेडिकल फाउंडेशनच्या सहकार्याने संस्थेचे केंद्र चालते.
संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४०० मुलांवर शस्त्रक्रिया झाल्या असून १,२०० मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. यातील अनेक मुले आता ऐकू आणि बोलू लागली असून काहींनी उच्च शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसायही सुरू केला आहे, असे संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी सांगितले.
वयाच्या तीन वर्षांच्या आत उपचार झाल्यास मूल ऐकू शकते. त्यानंतर सहा वर्षांपर्यंत वाचा आणि भाषेचे प्रशिक्षण तसेच पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते आणि पुढे मुलांना नियमित शाळेत प्रवेश मिळतो. मुलांना घरीही सराव करता यावा म्हणून त्यांच्या मातांनाच प्रशिक्षित केले जाते, असे डॉ. वाचासुंदर म्हणाले.
वायसीएम केंद्रात सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत शून्य ते सहा वर्षांच्या मुलांना खेळांच्या माध्यमातून भाषा आणि वाचेचे प्रशिक्षण दिले जाते, अशी माहिती प्रशिक्षक सीमा कुलकर्णी यांनी दिली.
पिंपरीतील वायसीएमसह राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, दौंड, पिरंगुट-उरवडे (निवासी केंद्र) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे संस्थेची केंद्रे आहेत. संस्थेकडे सुमारे ५० प्रशिक्षक असून त्यात ३५ माता-प्रशिक्षकांचा समावेश आहे.









